
नागपूर मध्ये साकारणार जगातील सर्वात मोठे दिव्यांग स्नेही उद्यान
जितेंद्र गवळी- वृत्तशक्ती न्युज
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी अनेकदा नाविन्यपूर्ण कल्पनेतून अनोखे प्रकल्प साकारत असतात. आता पुन्हा एकदा नितीन गडकरी आणि त्यांचे खाजगी सचिव संकेत भोंडवे ( IAS )यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात एक अतिशय चांगला आणि अनोखा प्रकल्प साकारला जाणार असून हा 12 कोटींचा प्रकल्प नागपूर इंप्रुव्हमेंट ट्रस्ट (एनआयटी) च्या माध्यमातून राबवला जाणार आहे.
‘दिव्यांग अनुभूती समावेशी पार्क’ असे या प्रकल्पाचे नाव असून हे दिव्यांगांसाठीचे विशेष उद्यान असणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण 21 दिव्यांगत्वांसाठी अनुकूल सोईसुविधा असणार आहेत. अशा सुविधा असणारे हे जगातील सर्वात मोठे उद्यान असणार आहे.
नागपूर येथील बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्पबद्दल माहिती घेतली. यावेळी रस्ते व महामार्ग मंत्र्यांचे खाजगी सचिव संकेत भोंडवे (IAS) यांनी प्रकल्पाबद्दल प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली.
या उद्यानात खालील वेगवेगळे विभाग असतील :
1. सेन्सरी पार्क
या उद्यानात एक संवेदी विभागदेखील असणार आहे. जेथे दिव्यांग व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी गंध, आवाज, स्पर्श आणि चव यांसारख्या त्यांच्या जन्मजात संवेदी क्षमतांचा वापर करू शकतात. दिव्यांग मुलांकडे स्पर्श आणि वासाचे विशेष ज्ञान असल्यामुळे अनेक गोष्टी ते स्पर्शाने आणि वासाने समजून घेत असतात. त्यांच्या संवेदनांच्या विकासासाठी त्यांना निसर्गाशी जोडणे गरजेचे आहे. या क्षमतांचा विकास घडवून आणणे हा सेन्सरी पार्क चा उद्देश असणार आहे. याठिकाणी दिव्यांग मुले स्पर्श आणि वासाच्या माध्यमातून औषधी वनस्पतींचा अभ्यास करू शकतील.
2. क्ले युनिट :
चिकणमाती विविध उपचारात्मक पद्धतींमध्ये वापरली जाते. सिरॅमिक्सच्या वापराने व्यक्तींच्या मानसिक क्षमतेमध्ये अभूतपूर्व बदल होत असल्याचे अनेक अभ्यासांद्वारे दिसून आले आहे. याच आधारावर दिव्यांगांमध्ये साहस, सर्जनशीलता, आत्मविश्वास इत्यादी वाढण्याच्या दृष्टीने या विभागाची रचना केली जाणार आहे.या ठिकाणी विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी नाटक, प्रदर्शन, शो आणि मनोरंजक शैक्षणिक क्रियाकलापांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. मुले थेट मैफिलीत सहभागी होऊ शकतात, वाद्य वाजवण्याचा आनंद घेऊ शकतात आणि संगीत ऐकू शकतात.
3. हायड्रोथेरपी कक्ष :
स्नायूंचे सामर्थ्य वाढवणे, शारीरिक क्षमता वर्धन, रक्ताभिसरण आणि विविध शारीरिक हालचालींमध्ये सरळता यावी यासाठी का विभाग असणार आहे. सेरेब्रल पाल्सी सारख्या परिस्थितीशी लढण्यास यामुळे दिव्यांग व्यक्तींना मदत मिळेल.
4. वॉटर फॉलिंग साउंड थेरपी :
गळणाऱ्या पाण्याचा आवाज नैसर्गिकरित्या दिलासा देणारा असल्याने, काही लोक त्यांच्या ध्यान पद्धतींमध्येही याचा समावेश करतात. वाहत्या पाण्याच्या शांत आवाजाचे उपचारात्मक स्वरूप, कारंज्यांचे पडणारे पाणी तणाव लक्षणीयरीत्या कमी करू शकते. विशेष मुलांचे मानसिक आरोग्य आणि त्यांच्यामधील शांतीची भावना वाढावी यासाठी या विभागाची रचना असणार आहे. याठिकाणी कृत्रिम पाण्याचा झरा असेल.
5. इपीडीएम (EPDM) फ्लोअरिंग :
दिव्यांग व्यक्तींना खेळाचे मैदान म्हणून EPDM फ्लोअरिंगचा वापर केला जातो. EPDM हा सिंथेटिक रबरचा एक प्रकार आहे जो सर्वात सुरक्षित आहे कारण तो गैर-विषारी, अत्यंत टिकाऊ आहे तसेच मऊ असल्याने खेळताना दुखापत टाळण्यासाठी उपयुक्त आहे.
या सर्व विभागांमध्ये दृष्टीदोष असलेल्या व्यक्ती त्यांच्या समोरच्या मार्गाचा मागोवा घेण्यासाठी छडीचा वापर करू शकतात. जेव्हा छडी येथील जमिनीवरील विशेष प्रकारच्या टाइलला (टॅकटाईल टाईल्स) स्पर्श करते तेव्हा त्या व्यक्तीला पुढील मार्गावर नेव्हिगेट कसे करावे याबद्दल माहिती मिळेल अशा प्रकारचे तंत्रज्ञान याठिकाणी वापरले जाणार आहे.
भारतातील पहिले दिव्यांग उद्यान होशंगाबाद येथे :
देशात उज्जैन, टिकमगड, ठाणे आणि होशंगाबाद या ठिकाणी दिव्यांग उद्याने आहेत. नागपूरचे हे उद्यान देशातील 5 वे उद्यान असेल. गडकरींचे खाजगी सचिव असलेले संकेत भोंडवे (IAS) होशंगाबाद चे जिल्हाधिकारी असताना त्यांनी भारतातील पहिले दिव्यांग उद्यान साकारले होते. दिव्यांगांसाठीच्या कार्यासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. या उद्यानासाठी इस्राईल, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या 3 देशांकडून तंत्रज्ञान घेतले होते. त्यानंतर भारतात अन्य चार ठिकाणी दिव्यांग उद्याने साकारण्यात भोंडवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता असाच प्रकल्प भव्य दिव्य स्वरूपात नागपूर मध्ये साकारला जाणार असून हे जगातील सर्वात मोठे उद्यान असणार आहे. सामाजिक समावेशनाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असून यामुळे भारतासाठी ही अभिमानस्पद गोष्ट आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.